सोलापूर शहर

भारताच्या इतिहासात आपले अद्वितीय स्थान राखणारे सोलापूर

कापड गिरण्यांचे शहर, कामगारांचे शहर सोलापूर

सोलापूर... दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रमुख शहर. हे शहर भारताच्या इतिहासात आपले विशेष महत्व राखून आहे. जगभरातील खवय्यांना भुरळ घालणारी खाद्यसंस्कृती तसेच समृद्ध असा सांस्कृतिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा सोलापूरला लाभला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून सोलापूरचे महत्व भारताच्या इतिहासात अद्वितीय आहे. इथल्या वस्त्रोद्योगांमुळे सोलापूरला आजही कापड गिरण्यांचे शहर म्हटले जाते. पूर्वीच्या काळात येथे विडी बनविण्याचे उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालत असत. कापड उद्योग आणि विडी उद्योग यांमुळे येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळत असे. यामुळे 'कामगारांचे शहर' अशीही सोलापूरची ओळख सांगितली जाई.


सोलापूर या शहराला प्राचीन काळात सोन्नलागी किंवा सोन्नलापूर म्हणून सुद्धा ओळखले जात असे. सोलापुरी चादरी असोत वा सोलापुरी शेंगा चटणी, इथली विशिष्ट उत्पादने जगभर आपली विशेष ओळख राखून आहेत. भारत सरकारच्या स्मार्ट सिटी अंतर्गत सोलापूरचे ही नाव या यादीत समाविष्ट झाल्याने आता सोलापूर शहर स्मार्ट शहर बनण्याकडे वाटचाल करताना दिसत आहे.

ग्रामदैवत

श्री सिद्धेश्वर हे सोलापूरचे ग्रामदैवत. बाराव्या शतकात थोर शिवभक्त शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेले हे मंदिर शहराच्या मध्यभागी असून तलावाने वेढलेले आहे. दर वर्षी मकर संक्रांतीच्या काळात येथे भरणारी गडड्याची यात्रा व काठ्यांची मिरवणूक हे पर्यटकांसाठी मोठे आकर्षण ठरते.

पेठांचे शहर

सोलापूर शहराची रचना नागरिकांना रोजचे व्यवहार सुरळीतपणे करता यावेत यासाठी पेठांच्या स्वरुपात केली गेलेली दिसून येते. सोमवार ते रविवार या वारांच्या नावांच्या पेठांबरोबरच साखरपेठ, भवानीपेठ, आंध्र भद्रावती पेठ, पाच्छापेठ, सिद्धेश्वर पेठ, लक्ष्मीपेठ, बेगमपेठ अशा अनेक पेठांनी बनलेले सोलापूर हे 'पेठांचे शहर' म्हणूनही ओळखले जाते.

दुग्धव्यवसाय आणि परंपरा

सोलापूर शहराची दूध व दूध उत्पादनांची गरज भागविणार्‍या दुग्धव्यवसायाचे केंद्र म्हणजे कसबा पेठ. सव्वाशे वर्षांपासून येथे हा व्यवसाय चालविला जात आहे. आषाढ महिन्यात येथे भरणारी महालक्ष्मी देवीची यात्रा व दिवाळीमध्ये तीन दिवस साजरा केला जाणारा म्हशी पळविण्याचा कार्यक्रम ही येथील खास आकर्षणे आहेत.

सोलापूरची ओळख...

सोलापूरमध्ये कापड उद्योगांना सुरुवात झाली ती १८७७ साली. सोलापूरातली पहिली कापड गिरणी 'जुनी मिल' या नावाने ओळखली जाते. ‘जुनी मिल’ हे सोलापूरचे वैभव मानले जाई. लष्करामधील छावण्यांसाठी तसेच सर्कशीच्या तंबूसाठीसुद्धा याच मिलचे दणकट कापड वापरले जाई. कापडगिरण्यांच्या या शहरात १९४८ साली सुमारे पन्नास हजार हातमाग होते. दणकट सोलापुरी चादरी आणि सोलापुरी पंचे आज जगभरात प्रसिद्ध आहेतच परंतु त्याचबरोबर इथल्या हातमागावर विणलेल्या साड्याही आपली विशेष ओळख राखून आहेत. आजही सोलापूर शहर कापड गिरण्यांचे शहर म्हणून प्रसिद्ध आहे.

वारसा स्वातंत्र्यलढ्याचा

स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० साली महात्मा गांधींच्या दांडी यात्रेवरून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्यसैनिकांनी सोलापूर पालिकेवर राष्ट्रध्वज फडकावला. देशातील ही पहिलीच व एकमेव घटना! यामुळे सोलापुरात मार्शल लॉ लागू करण्यात आला. स्वातंत्र्यसैनिक श्री मल्लप्पा धनशेट्टी, श्री अब्दुल कुर्बान हुसेन, श्री जगन्नाथ शिंदे व श्री किसन सारडा यांना खोट्या आरोपांखाली अटक करून १२ जानेवारी १९३१ रोजी फासावर चढविण्यात आले. हा दिवस सोलापूरमध्ये 'हुतात्मा दिवस' म्हणून पाळला जातो. या वीरांच्या स्मृतीमध्ये सोलापूर शहराच्या मध्यवर्ती भागात पुतळे उभारले गेले. हाच चौक 'हुतात्मा चौक' म्हणून प्रसिद्ध आहे.