व्यवसाय वृद्धी

0
व्यवसाय वृद्धी

सोलापूर जिल्हयामध्ये चालणार्‍या अनेक प्रकारच्या व्यवसायांना योग्य पाठबळ मिळून ते स्वयंपूर्ण व्हावेत, येथील व्यवसाय वाढीस लागावे हे सोलापूर सोशल फाऊंडेशनचे ध्येय आहे.

कापड उद्योग हा सोलापूर जिल्ह्यात स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आलेला उद्योग. १९४८ साली सोलापुरात सुमारे पन्नास हजार हातमाग होते. विडी बनविण्याचा उद्योगही येथे मोठ्या प्रमाणावर चालत असे. वस्त्रोद्योग आणि विडी बनविण्याच्या उद्योगांमुळे येथे खेड्यापाड्यातील अनेक कामगारांना रोजगार मिळत असे. वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगांसह सोलापूर जिल्ह्यात इतर उद्योगही मोठ्या प्रमाणावर चालत असत.

विविध कारणांमुळे सोलापूर जिल्ह्यातील बुद्धिजीवी वर्ग इतर मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होऊ लागला. शिक्षण, बुद्धिमत्ता, कौशल्य असणाऱ्या समाजाच्या स्थलांतरामुळे येथे नवीन उद्योगांच्या स्थापना होण्याच्या शक्यता कमी होऊ लागल्या. तसेच चालू असणार्‍या उद्योगांवरही अवकळा पसरू लागली. यामुळे विविध उद्योगांमधून होणार्‍या रोजगार निर्मितीसही खंड पडू लागला. परिणामी बेकारी, बेरोजगारी वाढू लागली याचा विकासावरही अप्रत्यक्ष परिणाम होऊ लागला.

या चक्रातून सोलापूर जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी येथे विविध व्यवसाय व उद्योग वाढीस लागले पाहिजेत. 'कापड उद्योगांचा जिल्हा' ही आजही सोलापूर जिल्ह्याची ओळख आहे. आधुनिक यंत्रमाग व पारंपारिक हातमाग या दोन्ही पद्धतीने येथे वस्त्रोद्योग चालतो. याच बरोबर विविध शेती व खाद्य उत्पादने व्यवसायही येथे मोठ्या प्रमाणावर चालतात. जगभर प्रसिद्ध असणारी 'शेंगा चटणी' हे त्याचे उत्तम उदाहरण होय. आज सोलापुरात वर्षाला सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल केवळ या शेंगा चटणीवर होते. याच प्रकारे सोलापूरच्या इतरही उत्पादनांना योग्य बाजारपेठ व मार्केटिंग मिळाल्यास हे उद्योगही वाढीस लागून त्यातून अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत मिळेल.

यासाठी येथील व्यवसायांना प्रोत्साहन देणे, नव्या व्यवसायांच्या स्थापनेसाठी पाठबळ व आर्थिक सहाय्य पुरविणे, आवश्यकतेनुसार व्यवसाय प्रशिक्षण देणे यांसारख्या योजनांद्वारे सोलापूर सोशल फाऊंडेशन सोलापूर जिल्ह्यामध्ये विविध उद्योग व व्यवसायांच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील आहे.