एक जिल्हा - एक विद्यापीठ - सोलापूर विद्यापीठ

क्लोज सर्किट कॅमेरा यंत्रणेचा योग्य वापर व 90 टक्के निकाल 30 दिवसांत लावण्याची कामगिरी करणार्‍या सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या कामकाज पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी इतर विद्यापीठांच्या अधिकार पथकांनी सोलापूर विद्यापीठास भेट देऊन माहिती घेतली आहे.

एक जिल्हा - एक विद्यपीठ या संकल्पनेचे पहिले उदाहरण म्हणजे सोलापूर. विद्या संपन्नता हे ब्रीद घेऊन सोलापूर परिसरातील उच्च शिक्षणाची गरज भागविण्यासाठी सोलापूर या एका जिल्ह्यासाठी स्थापन झालेले विद्यापीठ, अशी वेगळी ओळख असलेल्या या विद्यापीठाची स्थापना 22 जुलै 2004 रोजी झाली. प्रत्यक्ष कामकाज 1 ऑगस्ट 2004 पासून सुरू झाले. विद्यापीठाचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल माननीय श्रीयुत डॉ. मोहम्मद फजल यांच्या हस्ते झाले. डॉ. इरेश स्वामी हे सोलापूर विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होत. सोलापूर जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांना नवनवीन अभ्यासक्रम उपलब्ध करून, उच्च शिक्षणाची संधी देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हे विद्यापीठ करीत आहे. सोलपूर विद्यापीठ हे डिजिटल विद्यापीठ बनले आहे. सध्या डॉ. मृणालिनी फडणवीस या कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयाचा अभ्यासक्रम विद्यापीठात सुरू आहे. महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासक्रमात याचा उल्लेख होतो. पुरातत्व विभागातील संशोधनसुद्धा उल्लेखनीय आहे. विद्यापीठाने नुकतेच सुरू केलेल्या कौशल्य विकास विभागाला सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. त्यामध्ये योग अभ्यासक्रमाच्या 30 विद्यार्थ्यांच्या 2 बचेस पूर्ण होऊन पुढील दोन बॅचेस प्रतीक्षा यादीत आहेत. सध्या विद्यापीठाच्या वतीने संशोधन आणि बाहेरच्या नामवंत संस्थांशी सामंजस्य करार करण्यावर भर दिला जात आहे. सामाजिक शास्त्रे संकुल (जनसंज्ञापन, पुरातन शास्त्र, अर्थशास्त्र, नागरी) रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र, भूगोल इत्यादी विभाग चांगले स्थिरावले आहेत. परीक्षांचे निकाल वेळेत लावण्याच्या बाबतीत सोलापूर विद्यापीठाने प्रस्थापित विद्यापीठांना मागे टाकत अभिनंदनीय कामगिरी केली आहे.

Share: