किल्ले सोलापूर

सोलापूर शहरात आल्यानंतर काय पाहावे हा प्रश्नच पडू नये, अशी वास्तू या ठिकाणी दिमाखाने उभी आहे ती म्हणजे किल्ले सोलापूर. ज्या शहरास व किल्ल्यास मध्ययुगीन कालखंडात फार महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. त्या शहरामध्ये इतिहासप्रेमींनी, अभ्यासकांनी आणि हौशी पर्यटकांनी आवर्जून भेट द्यावी असे हे ठिकाण आहे. 1681 नंतर दक्षिणस्वारीवर आलेल्या औरंगजेबाचा नेहमीच मुक्काम येथे असे. दुसरे बाजीराव पेशवे, सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले 1818 मध्ये 1 महिने येथे राहिले होते. 1636 मध्ये कर्नाटकात जाताना आणि 1665 ला विजापूरकरांवर आक्रमण करण्यासाठी जाताना या किल्ल्यात अनुक्रमे शहाजीराजे भोसले आणि छत्रपती शिवराय यांचाही मुक्काम पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. सिद्धेश्वर तलावाच्या काठावरच हा किल्ला आहे.

खंदकाच्या आत असलेल्या दुहेरी तटबंदीमुळे हा किल्ला अभेद्य आणि बलदंड झालेला आहे. बाहेरील तटबंदीमध्ये चार कोपर्‍यांवर चार बलदंड बुरूज आहेत. तटबंदीमध्ये आणखी 22 बुरुजांची एक भक्कम साखळी आहे. 30 फूट उंचीची तटबंदी असून त्यावर जागोजागी मार्‍यासाठी छिद्रे केलेली दिसतात.

पुराणवस्तू संशोधन खात्याचा वार्षिक रिपोर्ट 1919-20 नुसार तोरो यांनी सचित्र महाराष्ट्र पुस्तकात नमूद केल्यानुसार 12 व्या शतकात हिंदू राजाने आतील कोट बांधला. नंतरच्या काळात हा किल्ला मुस्लिम शासकांच्या ताब्यात गेला. संपूर्ण किल्ल्याची बांधणी एकाच काळात पूर्ण झाली नाही. त्यात वेळोवेळी फेरफार होत गेला, ही गोष्ट निर्विवाद सत्य आहे.

Share: