सोलापूरचे समृद्ध साहित्यविश्व

भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे गुरुदेव रानडे यांचे चाहते होते. 1926 मध्ये त्यांचा ङ्गए कन्स्ट्रक्टिव्ह सर्व्हे ऑफ उपनिषदीक फिलॉसॉफीफ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. 1933 मध्ये त्यांचा ङ्गमिस्टिसिझम इन महाराष्ट्फ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. बारा वर्षे अभ्यास करून त्यांनी ङ्गपाथ वे टू गॉड इन हिंदी लिटरेचरफ हा ग्रंथ लिहिला.

सोलापूरच्या साहित्य परंपरेचा आढावा घ्यायचा तर आपल्याला थेट अकराव्या शतकात जावं लागतं. ग्रामदैवत म्हणून ख्यातकीर्त झालेले श्री सिद्धेश्वर मूळचे कवीच. सिद्धेश्वरांनी 68 हजार वचनं रचल्याचा उल्लेख त्यांच्याच एका वचनात आढळतो. पण सध्या तरी त्यांची 1300 वचनं उपलब्ध आहेत. तत्त्वचिंतन, उपदेश, विचार, भविष्याकडं पाहण्याची दृष्टी, रोजच्या वर्तनव्यवहारातील आचरण यासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं आहे. स्वतःच्या जगण्यातूनच त्यांनी हा आदर्श घालून दिला आहे.

शाहीर राम जोशी

आपल्या निर्भीड आणि बेदरकार वर्तनानं; त्याचवेळी अनुपमेय प्रज्ञा-प्रतिभेनं स्तिमित करणार्‍या कविराय राम जोशींचं काव्यकर्तृत्व थक्क करणारं आहे. ज्यांच्या लावणीतून शृंगाराची लागण होते त्या कविराय राम जोशींच्या शाहिरीनं रसिकांना वेड लावलं. राम जोशी यांच्या लावण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे तिची शब्दकळा आणि अलंकारप्राचुर्य. त्यांच्या नावावर प्रसिद्ध असलेल्या लावण्यांची संख्या आहे 104. 1762 ते 1812 अशा पन्नास वर्षांच्या आपल्या आयुष्यात राम जोशींनी अनेक मानसन्मान मिळवले; तसाच समाजाकडून धिक्कारही मिळवला. शाहीर राम जोशी हे नाव मराठी साहित्यात त्यांनी अजरामर केलं ते स्वतःच्या संपूर्ण चरित्रासह.

द. रा. बेंद्रे महाकवीचं सान्निध्य

महाकवी द. रा. बेंद्रे म्हणजे साक्षात्कारी पुरुष. साक्षात्कारी अशा अर्थानं की तुम्ही कोण आहात, त्याचा साक्षात्कार तुम्हालाच देतील. बेंद्रे द्रष्टे होते याची अनेक उदाहरणं सांगता येतील. बेंद्रे यांनी मराठीतूनही लेखन केलं आहे. 1965 साली दा. गो. देशपांडे यांनी त्यांचे 33 मराठी गद्य लेख आणि 44 मराठी कविता एकत्र करून त्याचा संवाद हा संग्रह प्रसिद्ध केला आहे. दैवी संपत्ती प्राप्त करून घेण्याचा एक कलात्मक कर्मयोग या दृष्टीने बेंद्रे साहित्याकडं पाहतात, असं त्यांच्या लेखनाबद्दल म्हटलं जातं.

अब्दुल रसुल कुर्बान हुसेन वृत्तपत्रीय लेखनातील प्रतिभा

अवघ्या बाविसाव्या वर्षी आपल्या प्राणाची आहुती देणारे हुतात्मा अब्दुल रसुल कुर्बान हुसेन हे देशाभिमानी संपादक, लेखक होते. ङ्गगजनफरफ या साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी स्वातंत्र्यपूर्वकाळातील भारताचे, सोलापुरातील घडामोडींचे नेमके, स्फूरणदायी वर्णन केले आहे. 1927 सालच्या डिसेंबर महिन्यात या साप्ताहिकाच्या प्रकाशनाला त्यांनी आरंभ केला आणि 1930च्या मे महिन्यात ते बंद पडले. लोकमान्य टिळकांच्या ङ्गकेसरीफवरून त्यांनी आपल्या वृत्तपत्राचे नाव ङ्गगजनफरफ असं ठेवलं होतं. अब्दुल रसुल कुर्बान हुसेन यांची भाषा अभ्यासपूर्वक विकसित झालेली होती.

कवी कुंजविहारी

पंधरा ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. हा देश सोडून जाण्यासाठी ज्यांनी इंग्रंजाविरुद्ध लढा दिला, त्यातलंच एक नाव होतं कवी कुंजविहारी. हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हे कुंजविहारी यांचं मूळ नाव. अक्कलकोट तालुक्यातील सलगर हे त्यांचं गाव. 1910 साली ते सोलापुरात आले. 1912 ते 1922 या दहा वर्षांत सकस कवितांची अनेक बीजे त्यांच्या मनात रुजली. कुंजविहारींनी लिहिलेल्या मुळशीच्या पाळण्याला राष्ट्रगीताची धार आली. 1926 साली गीतगुंजारव हा कुंजविहारींचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला. भेटेन नऊ महिन्यांनी ही त्यांची कविता त्या काळात खूप गाजली.

प्रतिभावान साधक गुरुदेव रानडे

सोलापूरपासून जवळच असलेल्या निंबाळ इथे गुरुदेव रानडेंचा आश्रम आहे. तिथंच त्यांची समाधीही आहे. 3 जुलै 1886 रोजी जमखंडीत जन्मलेल्या श्रीरामभाऊंचे घराणे मूळचे कोकणातल्या जामसंड्याचे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवगड तालुक्यात ते आहे. निंबाळला त्यांनी उपनिषदावरील ग्रंथ लिहून पूर्ण केला. कार्लाईल साईन्स ऑफ द टाईम्स अ‍ॅण्ड कॅरॅक्टरिस्टिक्स, हिस्ट्री ऑफ इंडियन फिलॉसॉफी, फिलॉसॉफिकल अँड अदर एस्सेज, भगवद्गीता अ‍ॅज फिलॉसॉफी ऑफ गॉड रियलायझेशन, एस्सेज अ‍ॅण्ड रिफ्लेक्शन्स, ध्यानोपकारिणी गीता, द वेदान्ता इज अ कल्मिनेशन ऑफ इंडियन फिलॉसॉफिकल थॉट्स हे त्यांचे ग्रंथ अद्वितीय आहेत.

जैनमुनी जिनदासशास्त्री

1894 साली जन्मलेल्या जिनदासशास्त्रींनी सुमारे 50 पुस्तके लिहिली.स्वतःच्या काव्यग्रंथांबरोबरच त्यांनी अनुवादित केलेले ग्रंथ मोठ्या संख्येने आहेत. पंडित जिनदासशास्त्रींच्या काव्यग्रंथांची यादी मोठी आहे. मात्र हे सगळे जैनधर्माशी संबंधित आहेत हे विशेष. संस्कृतातून प्राकृतात आलेले अनेक गद्यग्रंथही जिनदासशास्त्रीजींच्या नावावर आहेत. त्यामध्ये नेमिनिर्वाण, स्वयंभू स्तोत्र, सुदर्शन चरित्र, दशभक्ती, सुकुमार चरित्र, वरांग चरित्र, प्रीतिकर चरित्र, नागकुमार चरित्र, वर्धमान चरित्र, शांतिनाथ पुराण, भावसंग्रह, श्रीपाल चरित्र, सप्तव्यसन, रात्रीभोजन, त्यागकथा या ग्रंथांचा समावेश होतो.

मोठी साहित्य परंपरा

सोलापूरची साहित्य परंपरा खूप मोठी आहे. मराठी, कन्नड, हिंदी, उर्दू, तेलुगु भाषिक साहित्यिकांनी ती फुलवली, मोठी केली आहे. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुखांसारख्या प्रतिभाशाली साहित्यिकानं कादंबरी, कविता आणि समीक्षेच्या प्रांतात आपला मानदंड निर्माण केला तर डॉ. भगवानदास तिवारींनी बसवेश्वरांच्या जीवनचरित्राच्या अभ्यासातून हिंदीमध्ये विपूल लेखन केलं. लछमन हर्दवानी यांनी सिंधीत तर बाबूलाल जमादार यांनी कन्नडमध्ये ज्ञानेश्वरीचं भाषांतर केलं. नारायण कुलकर्णींनी ती प्रसाद ज्ञानेश्वरीच्या रूपात लिहून वेगळं प्रत्यंतर दिलं.

दुसरीकडं, शाहीर अमरशेख, विश्वासराव फाटे यांची कवनं, लोकनाट्यं जनजागरण करणारी. अनिष्ट रूढींवर कोरडे ओढणारी. डॉ. वि. म. कुलकर्णी, डॉ. निर्मलकुमार फडकुले, कविवर्य रा. ना. पवार, कवी संजीव, माधव मोहोळकर, कवी मा. गो. काटकर, प्रा. चंद्रभूषण कुलश्रेष्ठ, कवी दत्ता हलसगीकर, संस्कृतपंडित गुलामदस्तगीर बिराजदार, कुसुमाकर देवरगेण्णूर अर्थात वसंतराव दिवाणजी, डॉ. लक्ष्मीनारायण बोल्ली, विवेक घळसासी, डॉ. गो.मा.पवार, योगिराज वाघमारे, डॉ. द. ता. भोसले, हेमकिरण पत्की, रणधीर शिंदे, सुहास पुजारी, महेंद्र कदम, राजेंद्र दास, कल्पना दुधाळ, सुरेखा शहा, विजया जहागिरदार, निर्मला मठपती अशी अनेक नावं आणि त्यांच्या साहित्य कर्तृत्वाचा आढावा घेता येण्यासारखा आहे. या साहित्यिकांनी आणि पुढच्या पिढीतील दिग्गज लेखकांनी सोलापूरचं साहित्यविश्व समृद्ध केलं आहे.

Share: