हि. ने. वाचनालय दीडशे वर्षांची परंपरा

सुरुवातीला 30 सभासद असलेल्या आणि शे-सव्वाशे ग्रंथ असलेल्या या रोपट्याचे आता वटवृक्ष झाले आहे. दीडशे वर्षांच्या परंपरेमुळे 2700 सर्वसाधारण सभासद, मासिक 300 आणि बाल विभागाचे 200 असे 3000 एकूण सभासद आहेत. ग्रंथसंपदा 1 लाख 12 हजारांवर आहे.

सोलापूर शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकण्यामध्ये अनेक संस्थांचे योगदान आहे. चार पुतळ्याजवळील हिराचंद नेमचंद वाचनालय हे त्यापैकी एक. द्विशताब्दीकडे वाटचाल करणार्‍या या वाचनालयाने वाचकांची खर्‍या अर्थाने बौद्धिक भूक भागविण्याचे कार्य केले.

शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक किल्ल्याच्या समोर दिमाखात उभे असलेलेे हिराचंद नेमचंद वाचनालय पूर्वी नेटिव्ह जनरल लायब्ररी या नावे ओळखले जात असे. 1853 मध्ये दत्त चौकातील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक एकच्या एका खोलीत वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुढे ती शाळा पाडण्यात आल्याने पुन्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला. 1912 ते 1927 पर्यंत भावे वाडा, दाणे वाड्यात प्रबोधनाची ग्रंथचळवळ सुरू होती. यानंतर 1927 च्या काळात तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. वि. वा. मुळे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे नगरपालिकेकडून मोफत जागा मिळाली आणि खर्‍या अर्थाने वाचनालयाला हक्काची वास्तू मिळाली. या वाचनालयाचे सभासद असणे प्रतिष्ठेचे मानले जायचे. सोलापूर शहराचे पहिले लोकनियुक्त नगराध्यक्ष कै.रावबहादूर अप्पाजीराव देगावकर, रा. ब. गणेश व्यंकटेश जोशी, रवींद्रनाथ टागोरांचे बंधू न्यायमूर्ती सत्येंद्रनाथ टागोर, कल्पतरुचे संपादक नारायण गोविंद काकडे, कर्मयोगीचे संपादक रामभाऊ राजवाडे, डॉ. सखाराम किर्लोस्कर, डॉ. कृ. भि. अंत्रोळीकर, प्राचार्य के. पी. मंगळवेढेकर अशी कर्तृत्वसंपन्न मंडळी वाचनालयाचे सभासद होते.

Share: