सोलापूर उद्योग जगत

अक्कलकोट रस्ता, होटगी रस्ता आणि चिंचोळी एमआयडीसीत मिळून एकूण 300 लघु आणि मध्यम उद्योग आहेत.

अक्कलकोट रस्ता एमआयडीसी, होटगी रस्ता सहकारी औद्योगिक वसाहत आणि चिंचोळी एमआयडीसीत मिळून एकूण 300 लघु आणि मध्यम उद्योग आहेत. त्याशिवाय साखर आणि सिमेंट कारखाने वेगळे. साखर कारखान्यात तर देशात सर्वाधिक आणि सिमेंटच्या निर्यातीत तिसरा क्रमांक मिळवणारे सोलापूर आहे. जागतिक पातळीवर उत्पादने घेऊन जाणारे प्रिसिजन कॅमशाफ्टस प्रायव्हेट लिमिटेड, सबमर्सिबल पंपच्या उत्पादनात विश्वसनीय नाव असणारे एलएचपी अर्थात लक्ष्मी हैड्रोलिक्स यांनी सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेले. 15 हजार यंत्रमागांची धडधड तर कायमचीच असते. अनेक संकटे पचवून, तीव्र स्पर्धेला तोंड देत यंत्रमागधारक मार्गक्रमण करत असतात. त्यांच्या दिमतीला आता गारमेंट उद्योजकही सरसावले आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रदर्शने भरवून त्यांनीही परदेशी व्यापार्‍यांना आकर्षित केले. येणार्‍या कालावधीत गारमेंट हब होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

यतीन शहा

सोलापूरच्या काही उद्योजकांनी सोलापूरचे नाव जगाच्या नकाशावर नेले आहे. त्यातील पहिले नाव- यतीन शहा. प्रिसिजन कॅमशाफ्टस् ही या क्षेत्रात जगातील दुसर्‍या क्रमांकाच्या कंपनी. या कंपनीचे ते अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. त्यांच्या कंपन्यांचा विस्तार आता फक्त सोलापुरात राहिलेला नाही. आपल्या शेजारील चीन या देशात स्वतंत्र उत्पादने घेण्यात सुरुवात केली आहे. त्यानंतर प्रिसिजन या कंपनीने जपानमधील एका कंपनीशी करार करून त्याचे 59 टक्के शेअर्स खरेदी केली. म्हणजे मालकच झाले. कॅमशाफ्टस् निर्मितीत प्रिसिजनने घेतलेली भरारी ही सोलापूरकरांसाठी अभिमानास्पदच आहे.

डी. राम रेड्डी.

बालाजी अमाइन्सचे सहव्यवस्थापकीय संचालक. ही व्यक्ती तेलंगण प्रांतातील. पण सोलापूरच्या मातीवर त्यांनी इतके प्रेम केले की, सोलापूर सोडून आता काहीही शक्य नाही, असे ते सांगतात. कंपनीच्या विस्तारात सोलापूरच केंद्रबिंदू मानतात. देशात आयात होत असलेल्या रासायनिक घटकांना प्रतिबंध करणे अन् त्याची उत्पादने देशातच घेणे हा त्यांचा निर्धार. त्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ते नेहमी धडपड करतात.

शरदकृष्ण ठाकरे

लक्ष्मी हैड्रोलिक्सच्या माध्यमातून सबमर्सिबल पंपसेट निर्मितीमध्ये या कंपनीने देशात नाव मिळवले आहे. विश्वासार्ह दर्जा आणि विक्री पश्चात सेवा अशी कंपनीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. यांच्याशिवाय क्रॉस इंटरनॅशनलचे काशिनाथ ढोले असोत, गारमेंट उत्पादनातील भैरूलाल कोठारी, कोठारी पाइप्सचे कुटुंब, बंग डेटा फॉर्मचे वासुदेव बंग आदींनी सोलापूरमध्ये उद्योगाच्या क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे.

राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असणारी नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अर्थात छढझउ चा सोलापुरातसुद्धा प्रकल्प आहे. एकूण 1320 मेगावॅट क्षमता असणार्‍या या प्रकल्पात सध्या 660 मेगावॅटची निर्मिती होत आहे. लवकरच उर्वरित निर्मितीला सुरुवात होईल. एकूण निर्मितीपैकी 50 टक्के वीज महाराष्ट्राला मिळणार आहे.

Share: