लुसलुशीत हुरडा

हुरड्याच्या एका घासासोबत चटणीची चिमूट तोंडात टाकली की येणारी मजा काय सांगावी? सोबत गावरान बोरांची लज्जतही न्यारीच. तोडून आणलेले ज्वारीचं कणीस, चुलीत ते भाजायचं. नंतर हातावर चोळायचं अन् फुंकर मारत लुसलुशीत हुरड्यावर ताव मारायचा. सोलापूर आणि परिसरात अशा पार्ट्या जानेवारीपासून सुरू होतात. सकाळच्या हुरड्याप्रमाणंच दुपारचं चुलीवरचं कांदा-भाकरीचं जेवणही तितकच स्वादिष्ट लागतं. नंतर शेतात फेरफटका अन् घरी परत जाताना डहाळी, ऊसही खुणावतात.

सोलापूरकरांच्या जेवणात रोज तुरीचे अनेक पदार्थ असतात. प्रवासास तुरीचा पेंडपाला, भाकरी, डाळकांदा, कारळ चटणी न्यायची इथे पद्धतच आहे. संक्रांतीच्या दिवसात तीळ लावून बाजरीची भाकरी बनवली जाते. अनेकजण संक्रांतीची वाटच पाहात असतात. ज्वारीच्या पिठात तिखट, मीठ, ठेचलेला लसूण, हळद, हिंग घालून एखाद्या कापडावर पातळ थापून भाजलेला प्रकार म्हणजे धपाटे. सोबत मिरची ठेचा असेल तर चव वाढतेच.

Share: