करकंबची बाजार आमटी

सोलापूर जिल्ह्याचा ग्रामीण बाज म्हणून चटक-फटक ङ्गकरकंबची बाजार आमटीफ या प्रकाराची चव नाही चाखली तर कदाचित सोलापुरी चवविश्वातले अधुरेपण होऊ शकेल इतकी बाजार आमटी झपाट्याने महाराष्ट्रात लोकप्रिय होऊ लागलीय. या रस्सा आमटीची एक पारंपरिक जन्मकथा आहे.

काही शतकांपूर्वी व्यापारी आपला माल घोड्यावर लादून महिनो महिने करकंब (ता. पंढरपूर) या मध्यवर्ती गावात मुक्काम ठोकून असत. या व्यापारांना केवळ भाकरी बडवता येत असे. रात्रीच्या भोजनाला भाजी करायचे फारसे श्रम न घेता हे व्यापारी काळा मसाला, तेल, खोबरे, शेंगादाणे, तीळ, तूरदाळ, कच्चे मसाले असे सारे पदार्थ समप्रमाणात घेऊन त्यात लसूण, अदरक, कांद्याची दगडावर रगडून केलेली पेस्ट मिसळून या अफलातून मिश्रणाला खमंग फोडणी देत असत. यातून जी आमटी तयार झाली, त्याला नाव पडले करकंबची बाजार आमटी !

सर्दी, पडसे, ताप, थंडी अशा हंगामी रोगावर एक जालीम उपाय म्हणून ही आमटी अर्धापावलिटर प्यायलाही ते व्यापारी कमी करत नसत. अत्यंत चवदार व तिखटपणा न बाधणारी ही आमटी. यातील पारंपरिक बाज जपून व बॉईलिंग टायमिंगचे व इतर मिश्रणपद्धती अधिक चवदार करण्याचे संशोधनात्मक तंत्रशुद्ध गणित आखून नव्या ढंगात गेली बारा वर्षे सोलापूर जिल्ह्याच्या हॉटेल उद्योगात नाव कमावतेय. या बदलाचे श्रेय करकंबचे तरुण उद्योजक संतोष पिंपळे व राहुल पुरवत या दोघांकडे जाते. ही आमटी एकदा का चाखली की अस्सल खवय्ये पुन्हा पुन्हा या आमटीच्या प्रेमात पडतात.

डिश, हंडी करकंबला उपलब्ध होते.. लिटरच्या मापातील पार्सल स्वरूपातही सर्वदूर पाठवली जाते. मुंबई, पुणे, नगर, नाशिक, बीड, औरंगाबाद आदी जिल्ह्यांतून या आमटीची खास मागणी होत आहे. मोठ्या सोहळ्यातही ङ्गजरा हटके मेनूफ म्हणून अलीकडे या आमटीने टेबलावर मानाचे स्थान मिळवण्यास प्रारंभ केला आहे. अशा सोहळ्यासाठी ही आमटी तेथे जाऊन बनवून देण्याची सेवाही पिंपळे-पुरवत ही तरुण जोडगोळी करून देत आहेत. गरम भाकरी, बाजार आमटी व जोडीला हिरवी कांदापात व तोंडी लावायला खारे शेंगादाणे हा मेनू सोलापूर जिल्ह्याचा मदमस्त मेनू आहे. हा एकदा तरी चाखायलाच हवा.

वेळ अमावास्येला शेतात कडबा (बाजरीपासून बनवलेला वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ), भज्जी (अनेक भाज्या एकत्रित करून केलेली भाजी) असे एकाहून एक भन्नाट पदार्थ असतात. सध्यातरी वेळ अमावास्येला बनणारे पदार्थ बाहेर कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाहीत. प्रेमाने बनवण्यात येणार्‍या पदार्थांची विक्री करायची असते, हे गावाकडच्या शेतकरी दादाला इतक्यात रुचेल असे वाटत नाही.

Share: