संतभूमी मंगळवेढा

भीमानदीच्या कुशीत वसलेले मंगळवेढा संतभूमी म्हणून ओळखली जाते. संत चोखामेळा, संत दामाजी आणि कान्होपात्रा यांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेे आहे. भीषण दुष्काळ पडला. जनता हवालदिल झाली तेव्हा बिदरच्या महंमदशहा याचे खजिनदार असलेल्या दामाजीपंत यांनी बादशहाची पर्वा न करता धान्याची कोठारे जनतेसाठी खुली केली होती.

मंगळवेढा हे ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे. विजापूरजवळ असल्याने हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्त्वाचे होते. राजवाडे, धर्मस्थळे, तीर्थस्थळे यांचे भग्नावशेष मंगळवेढ्यात सर्वत्र विखुरलेले पाहण्यास मिळतात. त्यात कोरीव स्तंभ, भग्न मूर्ती, शिलालेख आहेत. शिवरायांचा मुक्काम सोलापूर जिल्ह्यात झाल्याची दाखवणारी एकमेव नोंद मंगळवेढा येथेच आहे. शिवरायांचा मुक्काम तेथील भुईकोट किल्ल्यात 18 नोव्हेंबर 1665 या दिवशी होता.

मंगळवेढ्यातील भुईकोट किल्ला, काशी विश्वेश्वर मंदिर, महादेवाची विहीर, ज्योतिबा माळावरील मंदिरे या इतिहासाच्या खुणा सांगतात. पुष्कर येथील ब्रम्हदेवाच्या मूर्तीनंतर किल्ल्यापाठीमागील महादेव विहिरीत एकमेवाद्वितीय ती ब्रम्हदेवाची मूर्ती सहा फूट उंच व साडेतीन फूट रुंद काळ्या पाषाणात कोरलेली आहे. त्याशिवाय महिषासुर मर्दिनी, तीर्थंकर यांच्या मूर्ती तेथे आढळतात. मंगळवेढा येथेच महात्मा बसवेश्वर यांचे वास्तव्य राहिले आहे. राज्य शासनाने येथे त्यांचे स्मारक मंजूर केले आहे. मंगळवेढ्यातील माचणूर येथे सिद्धेश्वारांचे प्राचीन मंदिर आहे. नदीच्या काठावरील हे मंदिर दगडी बांधकामातील असून येथेच आर्वीकर महाराजांचे वास्तव्य होते.

Share: