सोलापूरची वरदायिनी

419 गावांना पिण्याचे पाणी मिळते. धरणाचा जलसाठा महाराष्ट्रात सर्वात मोठा.माढा तालुक्यातील उजनी येेथे भीमा नदीवर उभारलेले धरण हे सोलापूरसारख्या दुष्काळप्रवण जिल्ह्याला वरदान ठरले. हे धरण 1980 मध्ये पूर्ण झाले. धरणाचा जलसाठा महाराष्ट्रात सर्वात मोठा असून तो 117.267 टी.एम.सी. इतका आहे. या धरणाच्या पाण्यावर माढा, मोहोळ, पंढरपूर, माळशिरस, अक्कलकोट इत्यादी तालुक्यांना सिंचनाचा लाभ होतो. हे धरण आठमाही आहे. त्यामुळे नदीमार्गातून पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, अक्कलकोट, सोलापूर या शहरांनाही पाणीपुरवठा केला जातो. एकूण 419 गावांना उजनी धरणातून पिण्याचे पाणी दिले जाते.

आशिया खंडातील सर्वात मोठा बोगदा सीना-माढा प्रकल्प

उजनीच्या बॅक वॉटरमधून उपसा करून माढा, करमाळा, इंदापूर, श्रीगोंदा, कर्जत या तालुक्यांना पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक कारणासाठी पाणी दिले जाते. उजनी धरणातून वीजनिर्मितीही केली जाते. त्याशिवाय दोन नद्या जोडण्याचा प्रकल्प उजनी धरणामुळे प्रत्यक्षात आला आहे. भीमा आणि सीना या दोन नद्या जोडण्यत आल्या आहेत. त्यासाठी 21 किलोमीटर लांबीचा बोगदा खोदण्यात आला असून, त्यातून उजनी धरणातून भीमेचे पाणी सीना नदीत सोडले जाते. एकूण 8 टीएमसी पाणी या योजनेमुळे सीना नदीला मिळते. या पाण्यावर कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातून मोहोळ, माढा, बार्शी आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा या तालुक्यातील क्षेत्र बागायती झाले आहे. हा जोडकालवा आशिया खंडातला सर्वात मोठा जोडकालवा आहे आणि त्यामुळे वरील चार तालुक्यांतील 23 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. उजनी धरणातील पाणी, बॅक वॉटरचे पाणी आणि या भीमा सीना जोडकालव्याचे पाणी यामुळे सोलापूर जिल्ह्यात उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे आणि त्यामुळे सोलापूर सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा ठरला आहे.

Share: