40 साखर कारखान्यांचा सोलापूर जिल्हा

पश्चिम महाराष्ट्र हा ऊसपट्टा म्हणून ओळखला जातो. नगरच्या प्रवरामध्ये विखे-पाटलांनी पहिला सहकारी साखर कारखाना काढला. त्यापूर्वी दि. माळी शुगर फॅक्टरी (माळीनगर, ता. माळशिरस) सोलापूर जिल्ह्यात सुरू झाली. जो खासगी कारखाना आहे. आज सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक 40 कारखाने असून, देशात सर्वाधिक साखरेचे उत्पादन होते. या कारखान्यांच्या माध्यमातून वार्षिक 3 हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या हाती पडतात. म्हणजेच या कारखान्यांनी ग्रामीण अर्थकारण मजबूत केलेले आहे. जिल्ह्याची वरदायिनी उजनी जलाशय आहे. पुण्यातील या धरणाच्या पाण्याने सोलापूर जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र वाढवले. माढा, माळशिरस, पंढरपूर या तालुक्यात सर्वाधिक ऊस पिकवला जातो. त्याचे वाढते क्षेत्र लक्षात घेऊन कारखान्यांची संख्याही वाढली. ज्यात सहकारी कारखाने मागे पडले, खासगी कारखान्यांची मोठी भर पडली. कोल्हापूरला सर्वाधिक उतारा असल्याने तिथे एफआरपी अधिक आहे. त्याच्या खालोखाल सोलापुरातील कारखाने उसाला भाव देतात. दोलायमान स्थितीचा सामना करत, शेतकरी संघटनांशी चर्चा करत गाळप हंगाम सुरू होतो. पट्टा पडेपर्यंत शेतशिवारातील शेतकर्‍यांच्या हाती पैसे दिला जातो. यातूनच समृद्ध खेडी दिसून येतात. जिथे पतपुरवठा करण्यासाठी बँका मोठ्या प्रमाणात या गावात गेल्या.

5 हजार ते 12 हजार मेट्रिक टन क्षमतेच्या या कारखान्यांमध्ये सहवीज आणि डिस्टिलरी प्रकल्पही उभे राहिले. उपपदार्थांची जोड मिळाल्याने कारखाने स्थिर राहिले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर सातत्याने कोसळत असल्याने कारखानदारांची कसरत होते खरी, परंतु त्याचे ग्रामीण अर्थकारण कोसळू दिले नाही.

Share: