सीताफळाचा जादूगार

बारा-तेरा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात फक्त पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र सीताफळाच्या लागवडीखाली होते. आता हे क्षेत्र 65 हजार हेक्टपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कसपटे यांच्या ङ्गएन.एम.के.-1फ या वाणाच्या सीताफळाच्या लागवडीखाली क्षेत्र गेल्या 5 वर्षांत वाढल्यानेच हा बदल झाला.

नवनाथ कसपटे यांच्या नावाशिवाय सीताफळ पिकाचा उल्लेख अपूर्ण ठरावा, असे कार्य सोलापूर जिल्ह्यातील गोरमाळेच्या (ता. बार्शी) या शेतकर्‍याने केले आहे. कसपटे यांचे शिक्षण अकरावीपर्यंत झाले. ते कार्यक्षम व अभ्यासू आहेत. त्यांची सीताफळाची बाग बघून थक्क व्हायला होते. त्यांच्या कष्टाची पाहणार्‍याला कल्पना येते. त्यांच्या शेतात बत्तीस जातींची सीताफळे आहेत. कसपटे यांनी निरीक्षणातून एनएमके 1 (गोल्डन) व एनएमके 2, एनएमके 3 आणि फिंगर प्रिंट या चार जाती विकसित केल्या. कसपटे यांनी सीताफळांच्या नव्या जातींना नावे देताना स्वतःच्या नवनाथ मल्हारी कसपटे नावातील आद्याक्षरांचा वापर केला. एनएमके 1 (गोल्डन) ही सीताफळाची जात सर्वोत्तम आहे. कसपटे सीताफळांची निर्यात परदेशी करतात. मात्र मुंबई ही त्यांची मुख्य बाजारपेठ आहे. एनएमके1 (गोल्डन) हे सीताफळ दुसर्‍या सीताफळांपेक्षा मोठे देखणे व चवीला गोड आहे. इतर सीताफळांच्या तुलनेत यात बिया कमी असतात. झाडावरून पिकलेले फळ पडले तर ते दबते, पण फुटत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस व झाडावरून काढल्यावर आठ दिवस टिकते. दुसर्‍या जातीच्या सीताफळांत तीस ते पस्तीस टक्के गर असतो, तर एनएमके1(गोल्डन) सीताफळात पन्नास टक्के गर असतो. सीताफळांचा एकरी खर्च लागवडीनंतर दरवर्षी पंधरा हजार ते वीस हजार रुपये इतका येतो, तर उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपयांपर्यंत येऊ शकते. सीताफळाला पाणी कमी लागते.

पंजाब विद्यापीठातील एक संशोधक विद्यार्थी तीन वर्षे कसपटे यांच्या शेतावर राहिला आणि त्याने एनएमके1 (गोल्डन) या सीताफळाच्या जातीवर पीएच.डी. पूर्ण केली!

सध्या अखिल भारतीय स्तरावर कसपटे हे सीताफळ उत्पादकांच्या संघाचे नेतृत्व करीत आहेत.  कधीकाळी डोंगरमाथ्यावर बेवारस अवस्थेत वाढणार्‍या या फळपिकाची यशोगाथा आता सातासमुद्रापार गेली आहे. या यशात सोलापूर जिल्ह्यातील कसपटे यांचे योगदान मोलाचे आहे.

Share: