शॉर्ट फिल्म स्पर्धा


सोलापूर जिल्हा व शहराचे देशपातळीवर ब्रॅंडिंग व्हावे व त्यायोगे प्रगती साधली जावी यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे शॉर्ट फिल्म स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये २६ फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करणार्‍या स्पर्धकांसाठी चित्रपट दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांच्या एक दिवसीय शॉर्टफिल्म मेकिंग कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

"सोलापुरात अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आहेत. इथल्या मातीचा, संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यासाठी शॉर्टफिल्म हे उत्तम माध्यम असून एखाद्या कल्पनेच्या आधारे सोलापूरचे सकारात्मक रूप जगासमोर आणावे. त्याआधारे शॉर्टफिल्म हे सोलापुरातील तरुणांना नव्या उंचीवर घेऊन जाणारे माध्यम ठरेल" असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी या कार्यशाळेमध्ये व्यक्त केला.
शॉर्टफिल्म स्पर्धेमध्ये सहभागी होण्यापूर्वी सोलापुरातील तरुणांना याबाबत अधिक तंत्रशुद्ध मार्गदर्शन मिळावे यासाठी या एक दिवसीय शॉर्टफिल्म कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सोलापुरातील तरुणांनी शॉर्टफिल्मच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याचे सकारात्मक ब्रॅण्डिंग करण्यासाठी सोलापूर सोशल फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. गुरुवारी सकाळी या कार्यशाळेस सुरुवात झाली. याप्रसंगी सोलापूर सोशल फाऊंडेशनचे सल्लागार प्रा. देवानंद चिलवंत, प्रा. नरेंद्र काटीकर, शोभा बोल्ली, लोकमंगल बँकेचे मुख्य व्यवस्थापक दिनकर देशमुख, डॉ.संध्या रघोजी, डॉ. शिरीष देखणे, दत्तात्रय चौगुले, श्रीकांत माळगे हे उपस्थित होते.

या कार्यशाळेत सोलापूरसह पुणे, मुंबई जिल्ह्यातील तरुणांचा समावेश होता. यावेळी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांनी तरुणांना या क्षेत्राविषयी विविध माहिती दिली. शॉर्टफिल्म हा अगदी कमी खर्चात तयार होणारे प्रभावी माध्यम आहे. त्यामुळे अनेक गोष्टी सांगण्यासाठी आपण तंत्रशुद्ध शॉर्टफिल्म शिकण्यासाठी काय काय करावे लागते याबाबत उमेश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.

Share: