वैरागचे श्री संतनाथ महाराज

फार पूर्वीपासून वैराग येथे वैरागी लोकांची गर्दी होती म्हणून ते वैराग. श्रीसंतनाथ महाराज ही वैरागची ग्रामदेवता मानली जाते. वैराग हे मोगलशाही हद्दीतील, निजामशाहीच्या सीमेलगतचे पहिले गाव. निजामाच्या राज्यातून मोगल सीमेत येण्यासाठी भरावा लागणारा जकात गोळा करण्यासाठीचा दगडी रांजण खुंटेवाडीनजीक शिवारात आढळतो.

सुमारे चारशे वर्षांपूर्वी वैरागस्थित घोंगडे यांच्याकडे संतू नावाचा एक गुराखी मुलगा काम करत असे. घोंगडे धार्मिक आणि परोपकारी होते. त्याकाळी पंचक्रोशीत श्रीमंत म्हणून त्यांचे प्रस्थ होते. ते काशीला देवदर्शनासाठी गेले असताना तेथे त्यांना गुराखी संतू दिसला. त्या चमत्काराविषयी त्यांनी संतूला विचारले व त्याचे खरे रूप दाखवण्याची प्रार्थना केली, तेव्हा श्री संतनाथांनी त्यांचे दिव्यदर्शन त्यांना दिले आणि वैरागग्रामी कायम वास्तव्याचे आश्वासन दिले. संपूर्ण दगडी बांधकाम, दर्शन मंडप कोरीव अष्टकोनी खांबांवर पेलले आहे. मंदिराचे भव्य प्रवेशद्वार, नगारखाना, दोन्ही बाजूला दगडी मनोरे या ठिकाणी आणि मंदिर परिसरात ओवर्‍यांमधून जुन्या मजबूत बांधकामाची प्रचिती येते. त्यासमोर लाकडी मंडप आहे.

गावाच्या लोडोळे वेशीजवळ श्री मल्लिकार्जुन मंदिर हेमाडपंती पद्धतीत, संपूर्ण दगडी बांधकाम -तटबंदीसह बांधलेले आहे. ते सुस्थितीत आहे. काशीहून आणलेली भव्य पिंड तेथील गर्भगृहात स्थापित केलेली आहे. मल्लिकार्जुन मंदिरानजीक नाथबाबा मंदिर, हनुमान मंदिर, धानम्मा - वीरभद्र मंदिर अशी मांदियाळी आहे.

वैराग हे मंदिरांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीसंतनाथ महाराज, श्री व्यंकोबाबा, श्री दयानंदबाबा वगैरे काही सिद्धपुरुषांच्या वास्तव्याने पावन झालेली भूमी. व्यापारी थेट उत्तरेतून कस्तुरी, केशर यांसारख्या किमती वस्तू विकण्यासाठी येत असत.

Share: