अकलूज शिवसृष्टी

पुणे आणि सोलापूरच्या मधोमध सोलापूर - पुणे महामार्गावर सोलापूरपासून 118 किलोमीटरवर  (पुणेपासून 167 कि.मी.) अकलूज हे पर्यटनाचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. शिवसृष्टी, वॉटर पार्क आणि धार्मिक शांतीसाठी अकलाईदेवी मंदिर व श्रीगणेश मंदिर पर्यटकांच्या समाधानात भर टाकते. आशिया खंडातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ठरलेल्या अकलूजची ओळख आता पर्यटन स्थळ म्हणून झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थान असलेले हे शहर 13 व्या शतकात यादव वंशीय राजा सिंघनने वसवल्याचा उल्लेख आढळतो. तेव्हापासून आजपर्यंत एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून हे शहर प्रसिद्ध आहे. नीरेच्या काठावर अकलूजचा भुईकोट किल्ला उभा आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिल्पकार श्री दिनकरराव थोपटे व अविनाश थोपटे यांनी म्युरल्स व पुतळे यांच्या सहाय्याने किल्ल्यात शिवसृष्टी निर्माण केलेली आहे. किल्ल्यात ठिकठिकाणी व कारंजी, हिरवळीचे पट्टे, फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे अकलूज किल्ल्याचा फेरफटका नेत्रसुखदच.

किल्ल्यात प्रथम फायबरच्या हत्ती व घोड्यावर बसलेले मावळे आपले स्वागत करतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नगारखाना असून त्यात विविध वादकांचे पुतळे बसविलेले आहेत. किल्ल्यात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूस चालत गेल्यावर किल्ल्याच्या तटबंदीवर शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित फायबरची म्युरल्स पाहायला मिळतात. म्युरल्समधील बारकावे, चेहर्‍यावरील भाव, आवेश पाहण्यासारखे आहेत. सर्वात शेवटी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या प्रसंगाचा देखावा मोठ्या दालनात साकारला आहे. त्यातील प्रत्येक मूर्तीचा पेहराव, त्यांची रंगसंगती, डोळे पाहण्यासारखे आहेत. किल्ल्याच्या मधोमध असणार्‍या उपल्या बुरुजावर शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. जिन्याने तिथपर्यंत जाऊन किल्ल्याच्या व आजुबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहता येते. याच बुरुजावर एका बाजूला दोर लावून बुरुज सर करणारे मावळे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूस शेकोटी पेटवून पहार्‍यावर बसलेले मावळे, रामोशी दाखविलेले आहेत. हे पुतळे पाहत किल्ल्याच्या तटबंदीवर फिरून नंतर प्रवेशद्वारापाशी असलेल्या संग्राहलयात जावे. या संग्राहालयासमोर हत्तीवरून दवंडी देणार्‍या मावळ्याचा पुतळा उभारलेला आहे. संग्राहलयात राजगड, रायगड, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, प्रतापगड, देवगिरी किल्ल्यांच्या फायबरमधील प्रतिकृती बनविलेल्या आहेत. याशिवाय अकलूजमधीलच अकलाईदेवीचे मंदिर, गणेश मंदिर धार्मिक पर्यटनात भर टाकतात.

महाराष्ट्राच्या विविध कलाप्रकारांमध्ये लावणी कलेला अव्वल स्थान आहे. लोककला म्हणून लावणी कलेशिवाय महाराष्ट्राची कला परंपरा पुढे सरकत नाही. स्वातंत्र्योत्तर काळात अकलूजच्या सहकारमहर्षी शंकरराव मोहिते यांनी लावणी कलेला आश्रय दिला. त्यांच्या पश्चातही अकलूजमध्ये 25 वर्षे अखंडपणे राज्यस्तरीय लावणी महोत्सव भरवण्यात आले.

गेल्या काही वर्षांपासून अकलूजमध्ये घोड्यांचा बाजार हा सुरू करण्यात आला आहे. तो पूर्वी पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेच्या वेळी भरत होता. या बाजारामध्ये जातिवंत घोडे राज्य व परराज्यांतून विक्रीसाठी येतात .

Share: