सोलापूरच्या कृषी अवजारांची राज्यभर ख्याती

सोलापूरच्या शेतीत परिवर्तन आणण्याचे काम येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने केले. गेल्या 80 वर्षांत या केंद्रातून विकसित केलेले फुले शेती यंत्र, दोन चाड्यांची पाभर, सायकल कोळपे अशी अनेक अवजारे आज महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली आहेत.

एस. व्ही. कानिटकर यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन केंद्र सुरू झाले. त्यांच्या नावाने एक संग्रहालय येथे उभे आहे. आजवर झालेल्या विविध संशोधनांची माहिती जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी उपयुक्त ठरत आहे.

राज्यातील 14 जिल्ह्यांतील 114 तालुके अवर्षणप्रवण क्षेत्रात येतात. यामध्ये संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा समावेश आहे. या विभागात वार्षिक सरासरी पाऊस 500 ते 700 मि. मी.च्या दरम्यान पडतो. हा पाऊस अतिशय लहरी असून, त्याची विभागणीही अनिश्चित स्वरूपाची असते. हा विचार करून संशोधन केंद्राने भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून अनेक शोध लावले आहेत.

1964 नंतर पिकांच्या संकरित आणि उन्नत जातीचा वापर सुरू झाला. मात्र या हरितक्रांतीमुळे उत्पादन वाढ मुख्यत: बागायत क्षेत्रात झाल्याचे आढळले. यातून बागायती आणि कोरडवाहू शेतकरी यांच्यात दरी वाढू लागली. या सर्व बाबींचा विचार करून भारत सरकारने अ. भा. पातळीवर सन 1970 मध्ये भारतात 23 केंद्रे स्थापन केली. यातील एक प्रमुख केंद्र सोलापूर येथे सुरू करण्यात आले. या प्रकल्पांतर्गत रोपे पैदास, कृषी अवजारांची निर्मिती, कृषी हवामानाच्या  अभ्यास, कृषी अर्थशास्त्र कोरडवाहू फळबाग, अणुजीवशास्त्र, पीक संरक्षण आदी विषयांचा अभ्यास करण्यात आला.

Share: