निसर्गरम्य रामलिंग

येडशी येथील रामलिंग हे सोलापूरपासून 80 किमी अंतरावरचं ठिकाण. अतिशय सुंदर वन पर्यटन स्थळ. अडीच हजार हेक्टर क्षेत्रावर पसरलेल्या अभयारण्याच्या मधोमध हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांचे आकर्षण केंद्र ठरत आहे. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला. दरीत उतरून गेल्यावर समोर येते ते नव्याने जीर्णोद्धार झालेले महादेव मंदिर. त्याचं कोरीव बांधकाम आणि भिंतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधतात. मंदिराला वळसा घालून

वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागील बाजूस कोसळणारा धबधबा आणि अभयारण्यातील डोंगराच्या अंगाखांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे वावरणारी, उड्या मारणारी माकडे (वानर सेना) अशा निसर्गरम्य वातावरणामुळे श्रावण महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यासह बीड, लातूर, सोलापूर जिल्ह्यातून भाविक हमखास रामलिंग तीर्थक्षेत्रास भेट देण्यास नागरिक गर्दी करतात.

महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचं चित्र कोरलं आहे. रावण व जटायूच्या युद्धात जटायू जखमी झाला. रामाने जटायूला पाणी पाजण्यासाठी इथे एक बाण मारला. त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली. इथेच जटायूचा मृत्यू झाला. ही समाधी जटायू पक्ष्याची आहे अशी आख्यायिका सांगतिली जाते. उन्हाळ्यात या पाण्याची धार लहान होत जाते. पण पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो.

रामलिंग देवस्थान परिसरात मोठी वनराई पाहायला मिळते. येथे जवळच आर्य समाज या संस्थेकडून चालवण्यात येणारे गुरुकुल आहे. गुरुकुलाला भेट देऊन तेथील पवित्र वातावरण अनुभवणे हे अविस्मरणीय ठरते. जवळच असलेल्या टेकडीवरील ब्रिटिशकालीन वास्तू पाहण्यासाठी पायी फेरफटकाही मारता येते. पावसाळ्यात या परिसराचे सौंदर्य अनेकपटीने खुललेले असते.

Share: