सिद्धक्षेत्र कुंथलगिरी

जैन धर्मियांची जी अनेक वेगवेगळी तीर्थक्षेत्रे आहेत, त्यांचे तीन प्रकार असतात. सिद्धक्षेत्र, कल्याणक्षेत्र व अतिशय क्षेत्र. ज्या तीर्थक्षेत्रावर चोवीस तीर्थंकर किंवा मुनी यापैकी कोणीतरी मोक्षाला गेलेले असतात त्याला सिद्धक्षेत्र म्हणतात.

भारतातील दिगंबर जैन धार्मियांचे एकमेव सिद्धक्षेत्र कुंथलगिरी हे आहे.

कुंथलगिरी हे ठिकाण धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यात आहे. सोलापूरपासून सोलापूर - धुळे या चौपदरी महामार्गावर 115 किमी अंतरावर आहे. हे एक सुप्रसिद्ध असे जैन तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी श्री. कुलभूषण देशभूषण भगवान यांचे मंदिर आहे. दिगंबर जैन समाजात या तीर्थक्षेत्राचे एक आगळे वेगळे महत्त्व असून छोट्याशा डोंगरावर वसलेल्या व निसर्गरम्य वातावरणात असलेल्या या तीर्थक्षेत्री श्री बाहुबलीची सुंदर मूर्ती आहे. तसेच या ठिकाणी असणारा श्री. 1008 मुनिसुव्रतनाथ मानस्थंभ अत्यंत पाहण्यासारखा आहे. कुंथलगिरी फाट्यापासून दोन कि.मी.वर हे सुंदर प्रेक्षणीय स्थळ आहे.

भारतभर प्रसिद्ध असलेला व अत्यंत चविष्ट व रुचकर असा पेढा हे कुंथलगिरीचे खास वैशिष्ट्य आहे. एकवेळ इथला ताजा ताजा पेढा खाणारा आवर्जुन पुन्हा पुन्हा या पेढ्यासाठी कुंथलगिरीला येतोच येतो. फार मोठी खवा व पेढ्याची बाजारपेठ येथे आहे व दूरदूरपर्यंत येथून पेढ्याची जावक आहे.

Share: